Sunday 18 March 2018

गनिमी कावा म्हणजे नेमके काय....?

अखंड हिंदुस्तानात सोळाव्या शतकात ह्या युद्धपद्धतीत शिवाजी महाराजांचा हात धरणारा दुसरा कोणीही नव्हता. किंबहुना शिवाजी महाराज गनिमीकाव्याचे गुरु होते असे
म्हंटले तरी चालेल.

शत्रूला तोंड देऊन न लढता त्याच्या भोवती घिरट्या घालून त्याची रसद तोडणे, शत्रूच्या आजूबाजूचा सगळा मुलुख बेचिराख करून त्याला अन्नपाणी मिळू न देणे, शत्रू युद्धात गुंतला असता त्याच्या राज्यात शिरून लूटमार करणे, आता त्याच्या प्रदेशात लूटमार सुरु झाल्यामुळे शत्रूला आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी म्हणून युद्ध सोडून परत आपल्या प्रदेशाकडे जाण्यास भाग पाडणे, शत्रूच्या छावणीवर शत्रू बेसावध असताना वारंवार छापे घालून त्याचे बळ कमी करणे असे हे गनिमी काव्याचे काही प्रकार.
गनिमी काव्यास डोंगराळ आणि झाडीचा प्रदेश सोयीचा असतो. शिवाजी महाराजांना कोंकण आणि मावळ ह्या प्रदेशांतील भाग या धोरणासाठी सोयीचा होता. फत्तेखान, अफझलखान, रुस्तुमजमा, सिद्धी जोहर, शाईस्ताखान, मिरझा राजा जयसिंग असे अनेक सरदार जेंव्हा स्वराज्यावर चाल करून आले तेंव्हा शिवाजी महाराजांनी अतिशय हुशारीने
ह्या गनिमी काव्याचा अगदी पुरेपूर वापर केला.
आता आपण ह्याची काही उदाहरणे पाहू.
विजापूरवर जेंव्हा मोगलांकडून दिलेलखानाने स्वारी केली तेंव्हा ह्या दिलेलखानाविरुद्ध विजापूरच्या मसाऊद ह्याने शिवाजी महाराजांची मदत मागितली.
ह्या वेळी दिलेलखान अगदीच विजापूरला येऊन भिडला होता. त्यामुळे महाराजांनी असा विचार केला कि विजापुरास मसाऊदच्या मदतीला जाऊन काहीही फायदा होणार नाही. कारण आता दिलेलखान हा विजापूरच्या वेशीवरच उभा आहे. म्हणून मग शिवाजी महाराजांनी जलदीने मोगलांच्या मुलखांत शिरून लूटमार करण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांनी खूपच धूम मांडली.
शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांस ह्या विषयी एक फार सुरेख पत्र लिहिले आहे.
पत्र फार महत्वाचे आहे. (मोठ्याने वाचा म्हणजे समजावयास सोपे जाईल. कुठे शब्द जर समजले नाहीत तर मला विचारा. )
ते असे:
शिवाजी महाराज लिहितात, " दिलेलखानाने विजापूरची पातशाही कमकुवत देखोन जोरावर धरून विजापूर घ्यावे या मतलबे विजापुरावर चाल केली. भीमा नदी उतरून शहरानजीक येऊन भिडला. हे वर्तमान अलिशान मसउदखान यांनी आम्हास लिहिले कि गनिमे जोरावर बहुत धरली आहे. येऊन मदत केली पाहिजे. त्यावरून आम्ही त्याच क्षणी स्वार होऊन मजली दर मजली करत पनालियास आलो. ( म्हणजे पन्हाळा किल्यास आलो.)
सारी कुळ जमेती जमा करून खासा लष्करानिशी विजापुरा सन्निध गेलो. विचारे पाहता गनीम कट्टा. (गनीम कट्टा म्हणजे शत्रू शुर आहे.) त्याहीमध्ये पठाण जाती हट्टी, याशी हुन्नरेच करून खजील होऊन नामोहरण होय तो हुन्नर करावा. म्हणून ऐशी तजवीज केली कि त्याचे मुलकांत फौजाचा पैसावा करून ओढ लावावा.
त्यावरून दिलेलखानास तीन गावांचे अंतरे सोडून भीमानदी उतरून तहद जालनापूर पावेतो मुलुख तारखत ताराज करीत चाललो. जालनापुरास जाऊन चार दिवस मुक्काम करून
पेठ मारिली. बहुत मालमत्ता हाती लागली.
जालनापुराहुन चार गावे औरंगाबादे जागा शहजादा असता त्याचा हिसाब न धरता पेठ लुटली. सोने, रूपे, हत्ती, घोडे, यांखेरीज मत्ता बहुत सापडली. ती घेऊन पट्टागड तरकीस स्वार होऊन कूच करून येता, मध्ये रणमस्तखान, व असफखान व जाबीतखान असच आणिक पांच सात उमराऊ आठ-दहा हजार स्वारांनिशी आले. त्यास शाहाबाजीच्या हुन्नरे जैशी तंबी करून घोडे व हत्ती पाडाव करून व पटियास ( पट्टा गड) आलो.
मागती लष्कर मुलकांत धुंदी करावयास पाठविले. "
मराठ्यांचं सैन्य गनिमीकाव्यात अत्यंत हुशार होत ह्याचा अर्थ मराठ्यांचे सैन्य मरणाला भिणारे होते असे नाही. 'मृत्यूविषयी बेफिकीर' हे तर मराठ्यांचे ब्रिदवाक्यच होते.
सभासदाने आपल्या शिवचरित्रात ह्या विषयी एक सुंदर श्लोक
लिहिला आहे.
जितेन लभते लक्ष्मी मृत्यनापि सुरंगना: I
क्षण विध्वंसिनी काया का चिंता मरणे रणे II
शिवाजी महाराज यवनांच्या लष्करी छावणींतील माहिती अतिशय हुशारीने काढून घेत. ती अशी.
" तो (म्हणजे शिवाजी महाराज) अंगावरचे सगळे कपडे काढून लंगोटी लावलेला माणूस शिबिरांत पाठवी. त्याने डोक्यावर गवताचा भारा घेऊन खानाच्या छावणीत जावे व गवत विकण्याकरिता घोड्यांच्या पागेची वाट धरावी आणि जाता येता शिबिरांत जाण्याच्या व येण्याच्या वाटा नीट पाहून मिळेल ती माहिती घ्यावी.
हि माहिती अपुरी वाटल्यास शिवाजीने स्वतः नेताजीस बरोबर घेऊन शिबिरांत गवत विकण्यास जावे. तेथे असता शत्रूचा विश्वास बसण्याकरिता त्याने ( म्हणजे शिवाजी महाराजांनी) आपणांस कश्या जखमा केल्या या विषयी त्यांनी आपसांत मोठ्याने गोष्टी बोलाव्यात. आणि चोहोकडे बारीक नजरेने टेहाळणी करावी. तिला हवा तितका वेळ न मिळाल्यास गवताचे भारे सुटल्याचे निमित्त करून तिथेच बसावे आणि ते बांधता बांधता आणखी काही हेरून निघून यावे."
शाहिस्तेखानावर छापा घालण्यापूर्वी महाराजांनी अशीच हेरगिरी केली असावी.
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा आजून एक किस्सा सांगतो:
एकदा विजापूरच्या सैन्याने घाटाची नाकेबंदी केली होती. आणि शिवाजी महाराज घाटाखाली अडकून पडले होते. महाराजांना घाट चढून सैन्यानिशी देशावर यायचे होते. त्यासाठी महाराजांनी आपली झालेली कोंडी पुढील उपायाने फोडली.
महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या लहान-लहान टोळ्या करून एका मागून एक टोळी वेगवेगळ्या वाटांनी घाटावर पाठविली. महाराजांच्या पहिल्या टोळीतील मावळे प्रथम विजापूरकरांच्या घाटावरील चौकीपाशी येऊन बसले. त्यांनी खूप दमल्याचा बहाणा करण्यास सुरवात केली. त्यांना पाहून चौकीवरील विजापूरकरांच्या सैनिकांनी विचारपूस सुरु केल्यावर त्यांस सांगितले कि आम्ही तुमच्याच सैन्यात भरती
व्हायला आलो आहोत. तेवढ्यात महाराजांची दुसरी टोळी तिथं पोहचली. त्या टोळीने चौकीच्या सैनिकांना सांगायला सुरवात केली कि "त्या चांडाळ शिवाजीने आमचे गाव लुटले आणि आमची माणसे मारली हो. आम्ही तेथून कसेबसे जीव वाचून सुटून आलो आहोत.
आम्हाला त्याच्यावर सूड घ्यायचा आहे. "
विजापूरकरांच्या चौकीवरील पहाऱ्यावर एकंदरीत तीस सैनिक होते. शिवाजी महाराजांचे मावळे होत होत करत ह्या तिसांना पुरून उरेल इतके जमले. त्यांतील काहींनी विजापुरी सैनिकांना बोलण्यात गुंतवून बाकीच्यांनी त्यांस वेढले आणि सर्वानी मिळून त्या विजापुरी सैनिकांना एकदम ठार मारले.
अश्याच गनिमी काव्याच्या क्लुप्त्या वापरून शिवाजी महाराजांनी शत्रूचे घाटमाथ्यावरील सगळे पहारे मोडून काढले आणि वाटा मोकळ्या केल्या."
शाहिस्ताखान जेंव्हा स्वराज्यावर चालून आला तेंव्हा त्याच्या सैनिकांनी शिवाजी महाराज पाहिले नव्हते. त्यामुळे मोगलांना शिवाजी महाराजांचे सैनिक शिवाजीचं वाटत असत. शिवाजी महाराजांचे सगळे सैनिक शरीराने आणि पोशाखाने सारखेच दिसत.
त्यामुळे महाराजांचा छापा पडला कि 'शिवाजी आला शिवाजी आला' अशी एकच हूल मोगलांच्या छावणीत उठत असे आणि पळापळ सुरु होत असे.
महाराज छापा घालताना पकडलेल्या सैनिकांचे अंगावरचे कपडेही काढून घेत असत. हे कपडे पुढील छाप्यात शत्रूस भ्रमात पाडण्यास कमी येत असत.
तर असा हा गनिमी कावा.
लेखक सतीश शिवाजीराव कदम


शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...