Tuesday 3 April 2018

अखंड स्फूर्तीचा झरा शांत झाला..

३ एप्रिल १६८०आजच्या दिवशी महातेजोनिधी शिवसूर्य मावळला.आपल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमाची दखल घ्यायला भाग पाडणारे भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या इहलोकीची यात्रा संपवून अवघ्या सह्याद्रीला दुःखाचे चटके लावून कैलासास गेले.
अखंड स्फूर्तीचा झरा शांत झाला.
आपले जीवित तृणवत मानून इहलोकी परलोकी किर्तीरुपाने उरले.
भगवान छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आजच्या या पुण्यतिथी दिनी महाराजांना शतशः नमन.
शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप।भूमंडळी।।

आपण अनेकदा एक वाक्य वाचतो...
‘क्या लेकर आए थे, क्या लेकर जाओगे..’ आज पुन्हा ते आठवले.. विचारांचा वेग वाढला.. इतका की पुन्हा ४०० वर्षांपूर्वी मन परतले..

कसं असतं आयुष्य.. आपण कुणाच्या उदरी जन्म घेतो, कुणाशी आपली खुणगाठ बांधली जाते, कोण आपले होते, कोण परके रहाते, आपले व्यवहार, आपले आचार, आपले विचार कसे घडतात?

सामान्य आयुष्य जगत असतांना एक ध्येय मिळते आणि मग ती विचारांची ठिणगी अख्खे आयुष्यच बदलून टाकते. एक न संपणारा प्रवास सुरु होतो आणि आपले विहित कर्म केल्याबरोबर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागते जसे आलो तसेच.. काहीही न घेता.. मग आयुष्यभर जो खटाटोप माणूस करतो तो कशासाठी? षडरिपुंच्या आहारी जाऊ नये हे माहित असूनही का आपण जातो? जन्म-मृत्यूचा खेळ माहित असूनही आपण का एखादा ध्यास घेऊन पळत असतो?

समाजात ध्येयासक्त माणसांना कधीतरी निरखून पहा. ते गर्दीत वावरत असले तरीही आपल्याच विश्वात रममाण असतात. मोजके आयुष्य आहे हे माहित असते आणि त्यात भले करावे हा एकंच ध्यास असतो. काही लोक आपली प्रतिष्ठा चिरकाल राहावी यासाठी दानधर्म करतात, काही निव्वळ पैसा कमावतात, काही सामाजिक क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करण्यात, समाजाचे दु:ख दूर करण्यात गुंतून जातात.

हा ध्यास, हे उद्धिष्ट, हे विचार, ही तंद्री कशी लागते? संसारात असूनही राष्ट्रहिताचे कार्य ‘राष्ट्र प्रथम’ या निष्ठेने कसे करता येते? अगदी कित्येकदा घरच्यांचा विरोध पत्करून, अनेक भावनिक आणि मानसिक पाश तोडून ही माणसे ध्येयवेड्या जीवनाची कास कशी धरतात? मग ते कुटुंबावर अन्याय करतात का? हो पण आणि नाही पण. एका कुटुंबासाठी दुसऱ्या कुटुंबाचा सर्वस्वी त्याग करणे किंवा त्याच्यासाठी आपले जीवन समर्पित करणे.. ही कुटुंबं म्हणजे एक वैयत्तिक आणि दुसरे.. ‘वसुधैव कुटुंबकम’.. सारे विश्वाच आपले कुटुंब आहे, त्याला आपली गरज आहे आणि ती गरज ओळखून स्वत:ला झोकून देऊन आपापल्या क्षेत्रामध्ये ती कार्यमग्न होतात.
काहींना प्रसिद्धी मिळते काहींना नाही. पण त्याची पर्वा करणारे ध्येयवेडे होऊच शकत नाहीत आणि जे पर्वा करीत नाहीत ते मृत्युनंतरही अमर राहतात.

मृत्यूचे भय तुम्हा आम्हा सारख्या सामान्य माणसांना.. आपल्यावर आपले एक कुटुंब निर्भर असते. मात्र तरीही काळाचा आघात हा प्रत्येकाला कधी न कधी सहन करावा लागतो. आपण कितीही देव मानीत असलो तरी भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मानव अवतारात मृत्यूला शरण जावे लागलेच. जो जो जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. तो निसर्गनियम आहे त्याला कुणीही बदलू शकत नाही..

‘मौत ने ज़माने को ये समा दिखा डाला
कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला
याद रख सिकन्दर के हौसले तो आली थे
जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे’

नैसर्गिक मृत्यू आणि मानवाने केलेले आघात यात नैसर्गिक मृत्यू माणूस स्वीकारेल. पण मानवाने केलेले आघात मात्र पिढ्यानपिढ्या चालत राहतात. कत्तली होत राहतात. षडरिपूंमधले क्रोध, अहंकार त्याला कारणीभूत ठरतात. अनेक वीर योद्धे, देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांना सतत अशा गोष्टींना बळी पडावे लागते. कितीही ‘अखंड सावध’ असले तरीही आपलेच घात करणारे असतात हे मात्र विसरून चालत नाही. आणि अशावेळी मात्र अतोनात यातनांशिवाय काही काही उरत नाही.

जिवंतपणी माणसांचा छळ करणे आणि त्यांच्या मृत्युनंतर देवत्व बहाल करून त्यांचे गोडवे गाणे याउपर असंवेदनशील असे काहीच नाही. संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागले, संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली गेली अशी अनेक उदाहरणे या संतांविषयी देता येतील. राजपुतांच्या इतिहासात तर पिढ्यांनपिढ्यांचे हाडवैर सतत होते. महाराणा प्रतापांनी राजा मानसिंग यांच्यासोबत भोजन नाकारले म्हणून क्रोध, पृथ्वीराज चौहान राजा जयचंद यांच्या भेटायला गेले नाहीत म्हणून चक्क राजा जयचंदने शाहबुद्दीन घोरीला निमंत्रण देऊन पृथ्वीराज चौहान यांच्यावर आक्रमण करविले, राजा मारवर्मन कुलशेखरच्या मृत्युनंतर त्याच्या वीरवर्मन आणि जटावर्मन या मुलांमध्ये सत्तेवरून संघर्ष होऊन जटावर्मनने आलौद्दिन खिलजीचे सहाय्य आपल्या भावाविरुद्ध मागितले. म्लेन्छ भारतात आलेच ते मुळी सत्तास्थापन करण्याची असुरी महत्वाकांक्षा घेऊन. त्यांच्या इतिहासात तर गादीवरून सर्रास कत्तली होत. अगदी आपल्या बापाला पण सोडत नसत. मात्र त्याही उपर सत्तालोलुप ठरली ती आपलीच माणसे..

मांसाहेब जीजाऊ यांच्या वडिलांना लखुजी जाधवराव यांना व त्यांच्या सर्व पुत्रांना बादशाही दरबारात निघृण मारले गेले, छत्रपती संभाजी राजांना पण आपल्याच आप्तेष्टाने फितुरी करून पकडून दिले, तीच परिस्थिती शहाजी राजांची..

आज समाजासाठी कुणी काम करत असेल तर त्यालाही या अतोनात वेदनांतून जावेच लागते. आपल्या पुण्याचा तरुण तडफदार युवक अधिक कदम यांनी काश्मीर येथे अतिरेक्यांच्या गोळ्या झेलल्या तरीही तिथल्या अनेक आश्रित मुलींसाठी तो सतत कार्यरत आहे.. आजही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्री. गोविंद पानसरे यांनी लोकहितासाठी कार्य हाती घेतले त्यांची दिवसाढवळ्या कत्तल केली गेली. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या जीवाचे रान करून कार्य करणारी मंडळी आहेत. मात्र समाज कंटकांना कधीच चांगले पाहवत नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव.

हे सगळे आणि आजचीही परिस्थिती पाहिली की वाटते का? कुणासाठी? कशासाठी हा देह झिजवावा? परकीय समोरून तरी वार करतात, आप्तेष्टांचे वार मात्र हृदयाच्या आरपार जातात.

छत्रपती शिवरायांना कमी शत्रू नव्हते.. उलट आपलीच जास्त माणसे त्यांची शत्रू होती. आज आपण छोट्याशा वादाला कंटाळतो, व्यापारात failure ला घाबरतो, परीक्षेत कमी मार्क पडले, नोकरी मिळाली नाही, गृहकलह, हाती घेतलेल्या कार्यात यश मिळत नाही म्हणून खचून जातो. आपण success stories ने प्रेरित होतो पण त्या successच्या पाठीमागचे ‘mental determination’ आणि कष्टप्रद मार्ग विसरतो. दिसतो तो final verdict ‘successful’.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष फक्त अल्पकाळ जगले आणि देशासाठी ठोस काहीतरी करून गेले.
छत्रपती शिवरायांचे जीवन हा एक खडतर पण प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन आज अनेक पिढ्या घडताहेत. अगदी छोटासा अंश जरी त्यांच्या आदर्शांवर जगू शकलो तरी धन्य धन्य वाटते.
महाराज अजून जगायला हवे होते.. आपल्या देशाचा इतिहास, भूगोल सारेच बदलले असते. आयुष्याच्या अंत:काळात त्यांच्या मनात काय आले असेल यावर एक मन हेलावणारे गीत शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव कार्यक्रमात आहे. महाराजांच्या अंत:समयी त्यांना कोण यातना झाल्या असतील, त्यांच्या स्वप्नांचा ध्यास याची व्याप्ती आजही पूर्ण होऊ शकली नाहीये.. खूप खूप करायचे आहे.. घडवायचे आहे.. तोपर्यंत त्यांचा आत्मा त्या रायगडाच्या कुशीत तळमळत राहील..

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही...

तो ध्येयासक्त राहतो.. चिरकाल... पद्मश्री राव, सईशा फौंडेशन मुंबई

No comments:

Post a Comment

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...