Wednesday 14 March 2018

स्टीफन हॉकिंग Stephen Hawking 1942-2018

 स्टीफन हॉकिंग Stephen Hawking

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची खूप आवड होती.

स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे.

स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.

१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.

स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.

अशा या महान शास्त्रज्ञाचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले.

Quotes
Intelligence is the ability to adapt to change.
The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.
I have noticed even people who claim everything is predestined, and that we can do nothing to change it, look before they cross the road.



शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...